धक्कादायक! मानवी तस्करीमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल; राज्यात मुंबई, पुणे व ठाणे जिल्ह्यात सर्वात लोक गायब
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वी विदर्भातून एका वर्षात तब्बल 926 मुली गायब झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण मानवी तस्करीचे (Human Trafficking) असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आता मुले व महिलांच्या तस्करीच्या सर्वाधिक घटना मुंबई, कोलकाता आणि इंदूरसारख्या शहरांमध्ये घडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुले आणि महिलांच्या बेपत्ता होण्याचा डेटा गोळा केला गेला आहे. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल तयार केले होते, ज्याने आपला अहवाल 2019 मध्ये सादर केला होता.

या पॅनेलने सुप्रीम कोर्टाला सुचवले आहे की, एनसीआरबीला हरवलेल्या मुले व महिलांचा संपूर्ण डेटा एकत्रित करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून कुठे व कशी तस्करी होत आहे याचा तपास करणे सोपे जाईल. एनसीआरबीच्या अभ्यासानुसार, जबरदस्तीने केलेले विवाह, बालश्रम, घरगुती मदत आणि लैंगिक शोषण यासारख्या गोष्टी या तस्करीची प्रमुख कारणे होती. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम (UNODC) ग्लोबलने सन 2018 मध्ये तस्करीबाबतचा अहवाल जाहीर केला. या अहवालात असे सांगितले गेले आहे की, लैंगिक शोषणाच्या तस्करीच्या बळींमध्ये बहुतांश महिला होत्या. जबरदस्तीने तस्करी झालेल्या बळींमध्ये सुमारे 35% महिला होत्या. यात महिला आणि मुली दोघांचा समावेश होता.

दुसरीकडे जबरदस्तीने मजुरीसाठी तस्करी करण्यात आलेले अर्ध्याहून अधिक लोक पुरुष होते. लहान मुले गायब होण्याचे प्रमाण मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक आहे, तर हरवलेल्या महिलांच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात जास्त नोंद झाली आहे. 2016-18 दरम्यान मुले आणि महिला बेपत्ता होण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल दुसर्‍या क्रमांकावर होता. (हेही वाचा: 2019 मध्ये विदर्भात तब्बल 926 मुली बेपत्ता; मानवी तस्करीचे शक्यता, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह)

या अहवालानुसार, तस्करीच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे आयुक्तालय सर्वात कमकुवत असल्याचे दिसून येते. मुंबई आयुक्तालयात अनुक्रमे 4,718 आणि 5,201 महिला हरवल्याची नोंद झाली आहे, हे 2017 आणि 2018 मधील सर्वात जास्त आहे. पुणे आयुक्तालय अनुक्रमे 2,576 आणि 2,504 प्रकरणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.