विजया रहाटकर (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Maharashtra State Women's Commission Chairperson) विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी मंगळवारी, आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजप सरकारच्या काळात त्यांना हे पद देण्यात आले होते. रहाटकर या भाजपा महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. याधीही विजया रहाटकर यांनी औरंगाबाद शहराचे महापौर पदही भूषवले होते. आपला राजीनामा रहाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपूर्त केला आहे. 20 फेब्रुवारी 2019 रोजी रहाटकर यांना पुन्हा तीन वर्षांसाठी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते.

एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने, रहाटकर यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. सरकार बदलले आहे, त्यामुळे रहाटकर यांनी राजीनामा देऊन 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. हे प्रकरण इतके वाढले की, यामुळे शिवसेना आणि भाजप उघडपणे एकमेकांच्या समोरासमोर आले होते. महिला आयोगाचे अध्यक्षपद अराजकीय स्वरुपाचे असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (हेही वाचा: 'बुलेट ट्रेन'ला महाराष्ट्रात रोख? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रकल्पाबाबत)

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत व पदावरून काढण्याबाबत आयोगाच्या कायद्यातील तरतूदींचा मुद्दा विचारार्थ ग्राह्य धरलेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विजया रहाटकर म्हणतात, '18 फेब्रुवारी 2019 रोजी माझी नियुक्ती करण्यात आली होती. आता मी स्वतःहून पदाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार करावा.' तसेच त्यांनी गेल्या साडेतीन वर्षांमध्ये काम करताना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले आहेत.