Maharashtra State Government Employee DA Hike: राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ
Money | Representative Image (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Central Government Employee) पाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचार्‍यांना (State Government Employee) देखील महागाई भत्तांमध्ये (DA) वाढ मिळाली आहे. राज्यात सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात 1 जुलै 2019 पासून 11% महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 17% वरून 28% झाला आहे. कर्मचार्‍यांना 1 जुलै 2021 पासून हा नवा वाढीव भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबरचा वाढीव भत्ता देण्याचाही लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा लाखो अधिकारी आणि कर्मचार्‍यांना होणार आहे. करोना संकटामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेले वर्षभर फ्रीझ करण्यात आला होता. मात्र आता आर्थिक स्थिती सुधारल्यावर हळूहळू पुन्हा स्थिती पूर्वपदावर येत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी 2220 वाढ होईल तर जास्तीत जास्त 7100 रुपयांनी वाढ होण्याचा अंंदाज आहे.

1 जुलै ते 30 नोव्हेंबर दरम्यानच्या पाच महिन्यातील 10 टक्के वाढीव महागाई भत्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे अशी माहिती असल्याने यंदा राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी अधिकच गोड होणार आहे. राज्य सरकरी कर्मचारी प्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही 11 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी देखील डीए आणि डीआर अ‍ॅरिअर्सच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत.