एसटी महामंडळाकडून प्रवासासाठी विविध सवलती जाहीर; 12वी पर्यंतच्या मुलींना एसटीचा मोफत पास
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात. अशाच सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटीमहामंडळाने एक प्रस्ताव सरकार समोर सादर केला होता, ज्याला काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत फक्त 10वी पर्यंतच्या मुलींसाठी लागू होती. तसेच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पत्रकारांनाही आता वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय विविध समाजघटकांनाही एसटी प्रवासासाठी विविध सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 प्रवाश्यांना होणार आहे.

एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिला विविध सवलती देण्यात येतात. अशाच इतर अनेक सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली.

मंत्रिमंडळात मान्य केल्या गेलेल्या सवलती –

1) अहिल्याबाई होळकर योजना – या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे, ही सवलत आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येतआहे. ही सवलत 100 टक्के इतकी आहे.

2) विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास – 1986 नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत 66.67 % असेल.

3) सध्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये 50 % सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही बसमध्येही 45% सवलत लागू करण्यात येत आहे. यासाठी प्रतिवर्षी कमाल 4000 कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली आहे.

4) क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत – याआधी अशा रुग्णांना वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी 50 % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता 75 % करण्यात आली आहे.

5) अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत- पत्रकारांना सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर 100 टक्के प्रवास सवलत लागू आहे. मात्र आता आता वातानुकूलित शिवशाही बसेसमध्येही त्यांच्यासाठी 100 टक्केसवलत लागू करण्यात आली आहे.

6) सिकलसेल ग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्णांना 100 % प्रवास सवलत देण्यात येत आहे.

7) सध्या 100 % अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास 50 % प्रवास सवलत आहे. मात्र आता 65% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50% सवलत मिळणार आहे.

8) कौशल्य सेतु अभियान – काळाच्या बैठकीत ही नवीन योजना लागू करण्यात आली असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ. 10 वी)मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये 111 प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी 66.67 % टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे.