Maharashtra Shocker: भाचीच्या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणात एका व्यक्तीने विष टाकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, एकाही व्यक्तीने हे जेवण खाल्लेले नसून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील उतारे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. विष मिसळताना काही लोकांनी आरोपीला पकडले, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पन्हाळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा पोलिसांनी महेश पाटील (रा. उतारे गाव) याच्याविरोधात लोकांचा जीव धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा तरुणीचा मामा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी मामाच्या घरी वाढली आहे. या मुलीने नुकतेच गावातील एका तरुणासोबत पळून जाऊन त्याच्याशी लग्न केले होते. पाटील यांना हे मान्य नसल्याने त्यांनी मंगळवारी लग्नमंडपात झालेल्या लग्नसमारंभात घुसून पाहुण्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणात विषारी पदार्थ मिसळला.
त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरोधात भारतीय न्याल संहितेच्या (बीएनएस) कलम २८६ (विषारी पदार्थासंदर्भात निष्काळजी वर्तन), १२५ (इतरांचा जीव धोक्यात आणणारे कृत्य) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या अन्नात विषारी पदार्थ मिसळला होता, त्या अन्नाचे कोणीही सेवन केले नसून त्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.