School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Schools Reopen: राज्यात अद्याप कोरोनाची परिस्थिती कायम आहे. मात्र काही ठिकाणी लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गाडी रुळावर येण्यासाठी आता शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. याच संदर्भात शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत समोर आलेल्या डेटानुसार 85 टक्के पालकांनी शाळा सुरु करण्याबाबत सहमती दाखवली आहे. परंतु शाळा सुरु करण्यापूर्वी कोविड19 च्या गाइडलाइन्सचे पालन करावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात 8 वी ते 12 वी चे वर्ग 15 जुलै पासून सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत पालकांसह शिक्षकांकडून सुद्धा शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यासंदर्भात विचारले जात आहे. यामुळेच आता शाळा सुरु करण्याबद्दल सर्वेक्षण केले असून त्याची आकडेवारी समोर आली आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,296 नव्या रुग्णांची नोंद)

प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातून 52.48 टक्के, निमशहरातून 10.63 टक्के, शहरातून 36.89 टक्के पालकांनी शाळा सुरु करण्याबद्दल सकारत्मकता दाखवली आहे. यापैकी 83.79 टक्के पालकांनी शाळेत मुलांना सोडण्यास परवानगी असल्याचे दर्शवले आहे. पण 16.03 टक्के पालकांनी यासाठी नकार दिला आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातील सर्वेक्षण 12 जुलै पर्यंत केले जाणार आहे. यामध्ये पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना सामील करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये पुढील आठवड्यापासून शाळा सुरु होणार आहेत. कोविड-19 संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद होत्या. मात्र ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु होते. परंतु, आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शाळा भरणार आहेत. मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण न आढळलेल्या ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 15 जुलै पासून सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी दिली आहे.