Maharashtra Sarkari Naukri: महाराष्ट्रातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा सरकारचा निर्णय; आठ जिल्ह्यांमध्ये लवकरच पूर्ण होणार भरती प्रक्रिया
Job (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणू (Coronavirus) आणि त्यानंतरच्या लॉक डाऊनच्या (Lockdown) काळात देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता तब्बल 5 महिन्यांनतर हळू हळू गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. अशात महाराष्ट्र सरकार आता सरकारी नोकऱ्या (Sarkari Naukri) उपलब्ध करून देत आहे. लॉक डाऊनमुळे राज्यातील नोकर भरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता काही बाबतीत ती पुन्हा सुरु होत आहे. सन 2019 मध्ये राज्यातील तलाठी (Talathi) संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती,  परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट-क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने याला मान्यता दिली असून, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होता. (हेही वाचा: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी नवपदवीधारकांना काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या मानधन, पात्रता व कालावधी)

औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, वित्त विभागाने 4 मे 2020   रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते.

मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने या भरतीसाठी पुन्हा मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट-क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करणार आहे.