Maharashtra Tourism Internship: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी नवपदवीधारकांना काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या मानधन, पात्रता व कालावधी
Malshej Ghat (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते. यादरम्यान पर्यटन (Tourism) विभागाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अजूनही हे क्षेत्र रुळावर येण्यासाठी धडपडत आहे. अशात पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) इंटर्नशिप (Internship) कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधारक यामध्ये सहभागी होऊ शकतील. या कार्यक्रमात इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, ॲडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.

महाराष्ट्र सरकारच्याया या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी इंटर्नना दहा हजार रूपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. इंटर्नना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे.

पात्रता –

सोशल मीडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. 25 वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात.

अंतिम मुदत –

अर्ज करण्याची अंतीम मुदत 16 सप्टेंबर, 2020 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

कालावधी –

इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवार्द करतील त्यांना 5 महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल. (हेही वाचा: Indian Travel, Tourism क्षेत्राला कोरोना व्हायरसमुळे मोठा फटका; तब्बल पाच लाख कोटींच्या नुकसानीचा अंदाज- रिपोर्ट)

याबाबत, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.