परशुराम घाट (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशात आता मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणातील चिपळूणजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी गेल्या 20 तासांपासून पाऊस पडत आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र चिपळूण परिसरात अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कोकणात येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कळंबस्ते आणि लोटेकडे वळवण्यात आली आहे. सध्या हलक्या वजनाची वाहतूक कळंबस्ते-अंबाडस-लोटे मार्गे वळवण्यात आली आहे. परशुराम घाटाला पर्याय म्हणून हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे.

परशुराम घाटात दोन जुलैला शनिवारी रात्री उशिरा दरड कोसळली आणि वाहतूक बंद झाली. यापूर्वी अनेकदा परशुराम घाटातील दरड कोसळली आहे, त्याबरोबर मोठ मोठे दगडही कोसळले आहेत. हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार असेल तर प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करायला हवा, असे तिथल्या ग्रामस्थांनी सांगितले आहे. जर तुम्ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करत असाल तर, मुंबईपासून सुरुवात करून, तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्गे पुण्याला जाऊ शकता आणि नंतर गोव्यात पोहोचण्यासाठी सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव मार्गे NH 4 चा वापर करू शकता. (हेही वाचा: रायगड जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन; जाणून घ्या मदत क्रमांक)

दरम्यान, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.