Maharashtra Rain | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra Rains: महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाड्यात (Marathwada) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. हिंगोली, परभणी, जळगाव, नांदेड, बीड, लातूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ताज्या अहवालानुसार, अतिवृष्टीमुळे 12 जणांचा बळी गेला असून लाखो शेतकरी बाधित झाले आहेत. मुसळधार पावसामुळे गोदावरीसह नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील सुमारे 1,454 गावे 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बाधित झाली असून, यामुळे सुमारे 169 जनावरे मरण पावली आहेत. या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले आहे.

पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक आमदार संतोष बांगर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत. आतापर्यंत सुमारे 200 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे आणि राज्य अधिकारी मराठवाड्यातील पावसामुळे प्रभावित झालेल्या भागातून गावकरी आणि जनावरांची सुटका करत आहेत.

मराठवाड्यात मुसळधार पावसाचे थैमान-

परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या, पूर्णा आणि दुधना नद्यांना पूर आला आहे, परिणामी शेतजमिनी, मालमत्ता आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाने धुळे आणि नंदुरबारमध्ये मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला होप्ता. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवारी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Maharashtra Rain Update: बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला)

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.  1 जूनपासून राज्यात सरासरीच्या 126% पाऊस पडला आहे. प्रदेशानुसार, कोकणात सरासरीपेक्षा 30%, मध्य महाराष्ट्रात 51%, मराठवाड्यात 15%, आणि विदर्भात 16% पाऊस पडला आहे. उद्यासाठीही मराठवाड्यातील संभाजी नगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.