Congress | (Photo Credit: File Image)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shiv Sena) आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. यात आता काँग्रेस (Congress) आमदारांचाही क्रमांक लागल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचे मोठ्या प्रमाणावर स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता काँग्रेसच्याही पोटात गोळा येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण? याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आली नाही. मात्र हे आमदार कोणाच्याही संपर्कात नसल्याचे समजते. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटींग झाल्यामुळे काग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवावर चिंतन करण्यासाठी काँग्रेसने आजच एक बैठक बोलावली होती. मुंबईत पार पडत असलेल्या या बैठकीला हे पाच आमदार उपस्थित नसल्याचे समजते. (हेही वाचा, Shiv Sena Action On Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्हे, पक्षाने विधिमंडळ गटनेता पदावरुन हटवताच ट्विटद्वारे प्रत्युत्तर)

काँग्रेसने प्रयत्न करुनही या आमदारांशी संपर्क होत नाही. त्यामुळे या बैठकीसाठी हे आमदार उपस्थित राहणार की नाही याबाबत चिंता आहे. हे पाचही आमदार बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर त्यांनीही काही वेगळा निर्णय घेतल्याचा अर्ध काढला जाईल.