
Police Recruitment News: महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच नवी भरती (Maharashtra Police Bharti) काढली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती दिली आहे. राज्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि त्याविरोधात कारवाई करण्याासाठी पोलिसांकडे असलेली मनुष्यबळाची अनुप्लब्धता यावरुन विधिमंडळ सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पोलीस दलात आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे यंत्रणेवर मोठाच ताण येतो आहे. त्यामुळे ही उणीव भरुन काढण्यासाठी पोलीस दलातील रिक्त जागा भरल्या जातील, असे मुख्यमत्री तथा गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
पोलीस दलात किती जागा रिक्त?
महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण रिक्त जागांबाबत मिळालेल्या माहितीनुसार ती संख्या तब्बल 10,500 इतकी आहे. राज्यात नेहमीप्रमाणे 7 ते 8 हजार जागा दरवर्षी रिक्त होतात. या जागा भरल्या नाहीत तर त्या प्रदीर्घ काळ रिक्त राहतात. नजिकच्या काळात म्हणजेच पाठिमागील सलग तिन वर्षांमध्ये पार पडलेल्या पोलीस भरती मध्ये विक्रमी 35,802 रिक्त जागा भरल्या गेल्या. आगामी काळात आणखी भरती काढून रिक्त जागा भरल्या जातील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा, Navi Mumbai Police Bharti: पोलीस भरती चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक)
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी केवळ मनुष्यबळ वाढविण्यावरच भर दिला जाणार नाही. तर त्यासोबतच यंत्रणाही सक्षम केली जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल. शिवाय वाहतूक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी वाढवली जाईल. त्यासाठी ‘ सेंटर ऑफ एक्सलन्सी इन एआय ‘ करार गूगल कंपनीसोबत करण्यात आल्याची माहितीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यातील गुन्हेगारी घटत असल्याचा दावा करताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आकडेवारीच दिली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले की, राज्यातील गुन्हेगारीबद्दल सांगायचे तर, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 2 हजार 586 गुन्ह्यांनी घट झाली आहे. संपूर्ण देशपातळीवर विचार करायचा तर, गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर पहिल्या पाच क्रमांकामध्ये नाही, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना, दररोज पुढे येणारी नवनवी प्रकरणे पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्रालयाने वेळीच या प्रकरणांची दखल घेऊन कारवाई करावी. राज्यातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जाव्यात, अशा मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यास प्रतिसाद देत लवकरच पोलीस भरती केली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.