Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Update: परतीचा पाऊस हा साधारण ऑक्टोबर च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यापर्यंत असतो. मात्र यंदा पाऊस सुरु होण्यास विलंब झाल्याने परतीचा पाऊसही उशिरा सुरु झाला. मात्र या पावसाने मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याला झोडपून काढले. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु असून पुढील 24 तासांत हा जोर कायम राहणार आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही भागांसह पुण्यामध्ये एक-दोन जोरदार सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात येत्या 24 ते 48 तासांत गडगडाटासह जोरदार सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळे मुंबईत येत्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर (Kolhapur), रत्नागिरी (Ratnagiri) आणि परभणी (Parbhani) मध्ये पावसाचा जोर तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे.

स्कायमेट चे ट्विट:

हेदेखील वाचा- Pune Rains: पुणे शहरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ; रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे ओढे,नदी पात्राच्या पाण्यात वाढ

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर जर कायम राहिला तर दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडू शकते. मात्र सध्या तरी पावसाचा हा जोर पुढील 48 तासांकरताच असल्याने पुढील 1,2 दिवसांत हवामानाची काय स्थिती आहे हे कळेलच.

सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र सोमवारी महाराष्ट्रासह मुंबईत पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे मतदार राजाला मतदान केंद्रावर जाताना थोडा त्रास सहन करावा लागला. तसेच या निवडणूकीत मतदानाचा टक्का घसरल्याचे खापर या पावसावरही फोडण्यात आले आहे. दिवसभर सुरु असलेल्या पावसाने मुंबईत सोमवारी रात्री चांगलाच जोर पकडला आणि दादर, सायनसह मुंबईच्या ब-याच भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.