मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज (30 जुलै) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सकाळी काही मुसळधार सरी बरसल्या नंतर येत्या 24-48 तासांसाठी मुंबई सह किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम तर काही ठराविक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई आणि किनारपट्टी सोबतच उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या महाराष्ट्राच्या भागांमध्येही जोरदार सरी बरसण्याची शक्यता असल्याचं मुंबई हवामान वेधशाळेचे उप संचालक के एस होसळीकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.
दरम्यान मागील 4-5 दिवसांपासून काही काळ दडी मारलेला पाऊस आता पुन्हा दमदार कोसळायला लागला आहे. मुंबई सोबतच कोकणात, मराठावाड्यात पावसाचा जोर वाढल्याने आता सामान्यांसह शेतीची कामं करणार्यांसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे.
ANI Tweet
एक पावसाळी सकाळ मुंबईत...
24/48 तासात मुंबई आणी किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता.
उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठ वाडा च्या काही भागात जोरदार सरींची शक्यता. pic.twitter.com/k18AEpYwdu
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 30, 2020
मुंबई मध्ये सातत्याने जोरदार पाऊस पडत राहिल्याने सखल भागामध्ये पाणी तुंबायला सुरूवात होते. तर लॉकडाऊनमध्येही ज्यांना घराबाहेर पडणं, कामावर जाणं आवश्यक आहे त्यांना ट्राफिक जामचा थोडा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान 1 ऑगस्टपासून पुन्हा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच मुंबई हवामान वेधशाळेने दिला आहे.