वाघीण (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

यवतमाळ येथील पांढरकवडा परिसर नरभक्षक वाघिणीच्या दहशतीखालून बाहेर आला आहे. तब्बल १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या टी१ (T1) वाघिणीला ठार मारण्यास वनविभागाच्या बचाव पथकाला अखेर यश आलं. गेली अनेक महिने या वाघीणीने धुमाकूळ घातला होता. तिच्या प्रतापांनी नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत होते तर, वनवीभाग हैराण झाला होता. त्यामुळे या वाघीणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला शुक्रवारी(२ नोव्हेंबर) यश आले.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून जंग जंग पछाडले जात होते. त्यासाठी वनविभागाने तब्बल पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज असा लवाजमा तैनात केला होता. विशेष म्हणजे वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही तैनात करण्यात आले होते. पण, वाघिण इतकी बिलंदर की, इतका खटाटोप करुनही ती वनविभागाच्या हाती लागत नव्हती. अखेर, तिचा ठावठिकाणा शोधून काढत तिला ठार करण्यास वनविभागाल यश आले आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

एकूण १४ जणांचे प्राण घेतल्यामुळे या वाघीणीची भीती परिसरात प्रचंड मोठ्या परिसरात पसरली होती. वाघीणीच्या भीतीने नागरिकांनी गावाबाहेर पडणे सोडल्यामुळे शेतीची कामेही रखडली होती. त्यामुळे या वाघीणीचा काहीतरी बंदोबस्त करावा ही मागणी नागरिकांनी वनविभागाकडे सातत्याने लाऊन धरली होती. केळापूर, राळेगाव, कळंबसह पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी वाघिणीची सर्वाधीक दहशत आणि वावरही होता. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीने आपला वावर वाढवला होता. त्यामुळे इथेही भीतीची छाया कायम होती.