हर्षवर्धन सदगीर (संग्रहित संपादित प्रतिमा)

7 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील मानाच्या 'महाराष्ट्र केसरी'चा (Maharashtra Kesari)डाव रंगला होता. यामध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) या मल्लाने पटकाविला. हर्षवर्धनने पुण्याच्या काका पवार तालमीत (Kaka PawarTalim) कुस्तीचे धडे घेतले होते. त्या दिवशी हा सामना पाहण्यासाठी शरद पवारही (Sharad Pawa) उपस्थितीत होते. किताब जिंकल्यानंतर हर्षवर्धनवर शुभेच्छांचा वर्षाव झाला, कौतुक झाले. मात्र ठरलेल्या बक्षिसाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याची माहिती काका पवार यांनी दिली आहे. काका पवार यांच्या या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघातील वार्तालापात बोलताना काका पवार यांनी आज गुरुवारी ही धक्कादायक माहिती दिली. ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्यांना जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही', असे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजकांनी ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला दीड लाख रुपयांचे, तर उपविजेत्याला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अगदी मोठ्या स्केलवर या कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. मात्र हा किताब जिंकल्यावर हर्षवर्धन सदगीर याला फक्त 20 हजार रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कम अद्याप दिली गेली नाही. (हेही वाचा: हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'; राजकारणी नेत्यांनी केले अभिनंदन, पहा ट्वीट्स)

दुसरीकडे उपविजेता ठरलेल्या शैलेश शेळके याला काहीच रक्कम मिळाली नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामना पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडला. अंतिम निकाल लागल्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अत्यंत मानाची समजली जाणारी चांदीची गदा देत हर्षवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. मात्र ठरलेली बक्षिसाची रक्कम काही अद्याप या कुस्तीगीरांना मिळाली नाही.