Maharashtra Job Recruitment: दहावी, बारावी, ITI Diploma व Degree प्राप्त बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन महारोजगार मेळाव्याची मुदत 20 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

कोरोना विषाणू संसर्गा व त्यानंतर लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकरीवर, रोजगारावर गदा आली होती. राज्यातील बेरोजगार युवकांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे (Maharashtra Online Maharojgar Melava) आयोजन करण्यात आले होते. मात्र राज्यात नुकत्याच  झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने, या मेळाव्याचा कार्यक्रम आता 20 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असल्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले. सदर मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. दहावी, बारावी, आय.टी.आय पदवीका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. (हेही वाचा: महाराष्ट्र सरकारचा कोरोना काळात बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न; तब्बल 1 लाख 32 हजार लोकांना मिळाला रोजगार)

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे, लॉकडाऊनच्या काळात नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात एकूण 1,32,308 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.