मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कार्टून पाठवल्याने, शिवसैनिकांनी नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. यासह राज्याबाहेरही या घटनेबाबत निषेध दर्शविला जात आहे. अशात शिवसेनचे खासदार संजय (Sanjay Raut) राऊत यांनी, 'महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे, अशी घटना कोणासोबतही घडू शकते', अशी प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयशी संजय राऊत बोलत होते. याआधी राऊत यांनी, ‘नौदलाच्या माजी अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया’, असे ट्वीट केले होते.
एएनआयशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे, त्यामुळे अशी घटना कोणासोबतही घडू शकते. उत्तर प्रदेशात किती माजी सैनिकांवर हल्ला झाला आहे हे आपल्याला माहिती आहे काय? पण, संरक्षणमंत्र्यांनी त्यांना फोन केला नाही. आमच्या सरकारचा असा विश्वास आहे की, कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर हल्ला होऊ नये.’
एएनआय ट्वीट -
Maharashtra is a big state. Something like this can happen to anyone. Do you know how many ex-servicemen have been attacked in UP? But, Defence Minister didn't call them. Our govt believes that no innocent person should be attacked: Sanjay Raut over attack on retired Navy officer pic.twitter.com/cgX771SLdU
— ANI (@ANI) September 13, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या 8-10 कार्यकर्त्यांनी, काल नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली. (हेही वाचा: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया - संजय राऊत)
काल घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊत यांनी ट्वीट केले होते, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.’