महाराष्ट्रामध्ये काल (20 डिसेंबर) 7 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Result) जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पक्षाच्या चिन्हांवर नसून स्थानिक पातळींवर उभ्या केलेल्या गटा-तटांमध्ये लढवल्या जातात. यामध्ये अनेकदा नात्या-नात्यांमध्येच उमेदवार एकमेकांविरूद्ध उभे ठाकलेले दिसतात. त्यामुळे गावाच्या गावगाड्याची सत्ता कुणाकडे जाणार हे पाहणं अनेकदा उत्सुकतेचं असतं. तरूण नेतृत्त्वालाही या निवडणूकांमध्ये मोठी संधी असते त्यामुळे महाराष्ट्रात काल जाहीर निवडणूक निकालांमध्येही पहा असेच काही लक्षवेधी ठरलेले काही विजयी उमेदवार!
- रविंद्र आप्पासो आडके
मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र आप्पासो आडके यांनी कोल्हापुरात माजी सरपंच महेश नाझरे यांच्यावर मात केली आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गावात मनसेने जिल्ह्यात एकमेव जागा निवडून आणली आहे.
- नुहा जावेद
रायगड जिल्ह्यातील नुहा जावेद ढांगु या तरुणीला जिल्ह्यातील सर्वात कमी वयाची सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. रायगडमधील वाळवटी ग्रामपंचायतीमधून निवडून आली आहे. अवघ्या 22 वर्षिय नुहाने एनसीपी आणि उद्धव ठाकरे गटासोबत ही निवडणूक लढवली होती.
- आनंदा रामचंद्र भोसले
आनंदा रामचंद्र भोसले या कोल्हापूर मधील भाजी विक्रेत्याने देखील सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात तो भाजी विकत होता.
- विनोद बाबू राठोड
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत संस्थाचालक कल्याण राठोड यांच्याविरोधात त्यांच्याच संस्थेतील शिपाई विनोद बाबू राठोड हे रिंगणात होते. यामध्ये शिपाई असलेल्या विनोद बाबू राठोड यांचा विजय झाला आहे.
- यशोधरा राजे शिंदे
यशोधरा राजे शिंदे या फॉरेन रिटर्न तरूणीने देखील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये विजय मिळवला आहे. 21 वर्षीय यशोधरा आणि तिच्या पॅनलचा देखील विजय झाला आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतीत सरपंचपदी तिची निवड झाली आहे. अमेरिकेत जॉर्जिया मध्ये ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. ते सोडून आता ती गावाचा कारभार सांभाळणार आहे.
महाराष्ट्रात झालेल्या 7682 ग्रामपंचायतीत एकूण 65,916 सदस्य तसेच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाली. त्यापैकी 14,028 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर 699 सरपंच बिनविरोध निवडून आले. 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे.