Maharashtra Government Formation: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । Photo Credits: PTI

Maha Vikas Aghadhi Sarkar:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सोबतच शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीच्या सरकारच्या 6 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. शिवसेना(Shiv Sena), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाने मिळून आज किमान समान कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे कुटुंबाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या रूपाने थेट मुख्यमंत्री पदावर पोहचणारे ते ठाकरे कुटुंबीयातील पहिले ठाकरे आहेत. शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे केवळ इतकीच उद्धव ठाकरे यांची ओळख नसून राजकारणापलिकडे ते उत्तम फोटोग्राफर, संघटक, व्यंगचित्रकार आहेत. जाणून घ्या हळव्या मनाच्या उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काही खास गोष्टी.  Uddhav Thackeray Maharashtra CM Swearing Live Streaming: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा 'इथे' पहा लाईव्ह.  

उद्धव ठाकरे यांचं वैयक्तित आयुष्य ते राजकीय प्रवास

नाव: उद्धव बाळासाहेब ठाकरे

जन्म तारीख : 27 जुलै 1960 ( 59 वर्ष)

पत्नी: रश्मी ठाकरे

मुलं : आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे

शिक्षण: जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे पदवीधर

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे 2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण

महाराष्ट्राने अनुभवले आहे. 2004 साली त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले.

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला संघटित केले आणि वाढवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना - भाजपा एकत्र लढले मात्र 'मुख्यमंत्री'पद आणि सत्ता वाटपाच्या समान वाट्यावरून दोन्ही पक्षात मतभेद झाले. आता शिवसेना पक्षाने कॉंग्रेस आणि एनसीपी सोबत महाविकास आघाडी तयार केली आहे. पुढील सहा महिन्यात त्यांना विधानसभेवर निवडून यावे लागणार आहे.