Lockdown (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवला आहे. मात्र मिशन बिगेन अनेग (Mission Begin Again) अंतर्गत चालू केलेल्या सेवा-सुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, मिशन बिगेन अनेग अंतर्गत अनलॉकिंगला देखील सुरुवात झाली आहे. मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी महिन्याभरासाठी वाढवण्यात आला आहे.

जून महिन्यापासून लॉकडाऊनचे नियमांत शिथिलता देण्यात आली आणि अनलॉकिंगला सुरुवात झाली. अनलॉकिंगच्या पाच टप्प्यात राज्यातील बंद करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधा पुन्हा सुरु करुन जनजीवन पुर्ववत करण्याचे काम सुरु झाले. राज्यात जीम, दुकाने, उद्योगधंदे, व्यवसाय, मेट्रो, मोनो रेल, सार्वजनिक बस यांसह अन्य सेवा  सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यासाठी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तसंच सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्रही पाठवले आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे. परंतु, अद्याप शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. (Mumbai Local Train for All: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सेवा सुरु करण्यातसंदर्भात महाराष्ट्र सरकारचे रेल्वे मंत्रालयाला पत्र)

ANI Tweet:

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 16,60,766 वर पोहचली आहे. त्यापैकी 14,86,926 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1,29,746 सक्रीय रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 43,554 वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात सरकार आणि आरोग्य यंत्रणांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. मात्र पुढील सणासुदीच्या काळात संसर्गाचे प्रमाण वाढणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.