
FYJC 2020 Online Registration Dates: महाराष्ट्रामध्ये आता आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाचे 10,12 वी निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना MSBSHSE च्या एचएससी आणि एसएससी निकालाची प्रतिक्षा आहे. येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रातील 12वीचा निकाल तारीख आणि 10वीचा निकाल तारीख जाहीर होईल. मात्र तत्पूर्वी आता महाराष्ट्रात 11वी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दरम्यान Maharashtra FYJC Online Admission 2020 चं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबादमध्ये आज (15 जुलै) पासून सुरू होणारी प्रक्रिया 26 जुलै पासून सुरू होणार आहे. सध्या राज्यात काही लॉकडाऊन जाहीर केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये आता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी फॉर्मचा भाग 1 भरायचा आहे. यामध्ये कागदपत्र आणि वैयक्तिक माहिती यांचा समावेश असेल. तर भाग 2 मध्ये कॉलेजचा प्राधान्यक्रम हा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरण्याची मुभा असेल. यंदा कोरोना संकट काळात कमीत कमी वेळात ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यावर शिक्षण मंडळाचा भर असेल. त्यासाठी सध्या मॉक ट्रेनिंग सुरू करण्यात आलं आहे. इथे पहा सुधारित वेळापत्रक सविस्तर!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. तर यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचा भूगोला पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही यंदा निकालाची उत्सुकता आहे.