Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election Results 2024) मतमोजणीच्या अगोदर, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुरुवारी शहरातील मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध जारी केले. मुंबई पोलिसांनी मतमोजणीपूर्वी सर्व 36 मतमोजणी केंद्रांच्या 300 मीटर परिसरात लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी अधिकृत प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे की, 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या आगामी मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त (ऑपरेशन) अकबर पठाण यांनी हा आदेश जारी केला आहे.
हा आदेश 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:00 ते 24 नोव्हेंबर मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत लागू राहील. यामध्ये, निवडणूक अधिकारी किंवा कर्तव्यावर असलेले सार्वजनिक सेवक वगळता कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण शहरातील नियुक्त मतमोजणी केंद्रांच्या 300 मीटरच्या परिघात फिरण्यास किंवा गटांमध्ये एकत्र येण्यास मनाई आहे. या निर्बंधामागचा उद्देश अडथळा, सार्वजनिक गोंधळ टाळणे आणि निवडणूक कर्मचारी आणि जनता या दोघांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.
त्यात नमूद करण्यात आले आहे की, मतमोजणी केंद्रावर किंवा त्याच्या जवळ कर्तव्यावर असलेल्या निवडणूक अधिकारी किंवा सार्वजनिक सेवकाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मतमोजणी केंद्रापासून 300 मीटरच्या अंतरावर येणार मनाई आहे. या आदेशामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणांमध्ये बोरिवली आणि दहिसर ते अंधेरी, वांद्रे, वरळी आणि कुलाबा या शहरातील प्रमुख मतमोजणी केंद्रांचा समावेश आहे. ही केंद्रे विविध महापालिका शाळा, कम्युनिटी हॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पसरलेली आहेत, ज्याचा उपयोग निवडणुकीच्या निकालांच्या मोजणीसाठी केला जाईल. (हेही वाचा: Cash For Votes Allegations: पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस)
महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले असून, शनिवारी मतमोजणी होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अंदाजे 65 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने सत्ता कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे आणि त्यांना विरोधी महाविकास आघाडी (MVA) आघाडी टक्कर देत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना राबवल्या असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात अधिकारी तैनात करण्यात आले असून, बुधवारी 30 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशीही अशीच सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.