महाराष्ट्र राज्य दिवाळी बंपर लॉटरीच्या (Maharashtra State Diwali Bumper Lottery) तिकीटदारांमध्ये उत्सुकता आणि चिंता वाढत आहे. आज 3 कोटी रुपयांच्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर घोषित होणार होता मात्र लॉटरीची साईट, lottery.maharashtra.gov.in बंद पडल्याचे समजत आहे. महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी 2019 ची सोडत जाहीर करण्यापूर्वीच राज्य लॉटरी वेबसाइटमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. याबाबत सरकारने अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या लॉटरीमध्ये 3 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस आहे जे दोघांमध्ये विभागून देण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरी 2019 चा निकाल लक्ष्मीपूजनानंतर एक दिवस म्हणजेच आज सायंकाळी 4.30 वाजता जाहीर होणार होता. या निकालाची आजची तारीख 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज ही वेबसाईट अचानक काम करेनासी झाली आहे. दरम्यान दिवाळी बंपर लॉटरीच्या 6 सिरीज लॉटरी योजनेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, ज्यात DI-DA, DB, DC सारख्या मालिकांचा समावेश असेल. (हेही वाचा: दुबई येथे 9 वर्षीय भारतीय मुलीने जिंकली 10 लाख डॉलरची लॉटरी)
महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटवरून या तिकिटांची सोडत जाहीर होणार होती. या एका तिकीटाची किंमत रुपये 200 इतकी आहे. बक्षीसादाखल मिळणाऱ्या इतक्या मोठ्या रकमेमुळे सरकारच्या या लॉटरी निकालाबाबत नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. मात्र आज वेबसाईट डाऊन झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.