महापोर्टल परीक्षा । Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये महापोर्टलद्वारा घेतल्या जाणार्‍या परीक्षांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून येत असल्याचा अनेक तक्रारी मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. आता या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department) पदभरती परीक्षा पुढे ढकलली आहे. दरम्यान तांत्रिक दोष दूर झाल्यानंतर या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारा महा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेणं टाळावं असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारदारांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. असे सांगितले आहे. आगामी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक, परिचारक या पदांसाठी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच त्रुटी दूर करून ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे.

CMO Tweet 

मागील म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शासकीय नोकर भरतीसाठी महा पोर्टल सुरू केले होते. पण त्यामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अचानक परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.