मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ; पुढील 6 वर्ष राहणार आमदार
Uddhav Thackeray | Photo Credits: ANI/ Twitter

हाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. विधिमंडळामध्ये आज (18 मे) उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे. आता ते पुढील 6 वर्षांसाठी आमदार राहणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबतच 8 नवनिर्वाचित आमदारांचादेखील विधिमंडळात शपथविधी पार पडला आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दरम्यान या शपथविधीनंतर शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनाम्याचं खर्‍या अर्थाने चीज झालं अशी भावना मीडियाशी बोलून दाखवली आहे.

आज विधि मंडळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या डॉ. निलम गोर्‍हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे राजीव राठोड तर भाजपाच्या प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर यांची चार उमेदवारांचा समावेश आहे. सहा महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेत राज्यातील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम दिला आहे.

ANI Tweet  

राज्यपालांची घेतली भेट  

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.  यावेळेस राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचे अभिनंदन देखील केले.

दरम्यान 28 नोव्हेंबर दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आता त्यांना पुढील सहा महिन्यात आमदारकी मिळवणं गरजेचे होतं. त्यासाठी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विधनपरिषद निवडणूक न घेता त्याच्या ऐवजी राज्यपाल नियुक्तीने त्यांची नेमणूक व्हावी असा प्रयत्न झाला होता. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चूका दाखवत नियुक्ती ऐवजी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलं आहे.