मुंबई परिसरातील तीन नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा
मुंबई मेट्रो (Photo Credits: ANI)

Three new Metro projects in Mumbai area : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने आपल्या कार्यक्षेत्राचा आवाका वाढवला असून,  यात आता 3 नवीन मेट्रो प्रकल्पांची भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या तीन नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली. एमएमआरडीए बैठकीतही या नव्या 10,11 आणि 12 मेट्रो प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या नव्या मेट्रोचे काम सुरु करण्यात येईल. यामुळे वाहतुकीसाठी जास्त पर्याय आणि नागरिकांना रोजगारही प्राप्त होईल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

या नव्या मेट्रोद्वारे, मेट्रो 10 अंतर्गत गायमुख ते शिवाजी नगर (मीरा रोड), मेट्रो 11 अंतर्गत वडाळा ते सीएसटी आणि मेट्रो 12 अंतर्गत कल्याण ते तळोजा या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो 10 ही एकूण 11.2 किमीची असणार आहे, त्यासाठी 4 हजार 467 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे, मेट्रो 11 ही 11.4 किमी आणि खर्च 8 हजार 739 कोटी तर मेट्रो 12 ही 20.75 किमीची असणार आहे, त्यासाठी 4 हजार 132 कोटी इतका खर्च येणार आहे. मेट्रो 11 प्रकल्पातील 8 स्थानके ही भुयारी असणार आहेत.

मुंबईमधील वाढती रहदारी आणि ट्राफिक पाहता, एमएमआरचा विस्तार हा 4,254 किलोमीटरवरून 6,272 किलोमीटर इतका करण्यात आला आहे. यामध्ये आता पालघर तालुका, वसई तालुका, अलीबाग, पेन, पनवेल आणि खालापूर तालुका हा परिसरही समाविष्ट करण्यात आला आहे. याचसोबत सध्या शहरात मेट्रो 2,3,4 आणि 7चे काम जोरात सुरु असून, पुढच्या वर्षी अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग- 7 आणि दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो मार्ग 2 सुरू होईल.