Maharashtra Cabinet Expansion: आदित्य ठाकरे ते अमित देशमुख; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट विस्तारामध्ये 'अशी' दिसली घराणेशाही
Maharashtra Government | Photo Credits: Twitter

Maharashtra CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आज 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासाठी आमदारांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर थोड्याच वेळात खातेवाटप जाहीर होणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या जंम्बो मंत्रिमंडळामध्ये घराणेशाही देखील प्रकर्षाने दिसली. आज शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये 9 जणांच्या घरात राजकीय वारसा आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि अगदी जयंत पाटील यांच्या घरातील पहा कोणत्या व्यक्तींना मिळाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान?

उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह 28 नोव्हेंबर दिवशी शिवाजी पार्कवर शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा आमदारांसह राज्यातील जनतेला लागली होती. Maharashtra Government Expansion: वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर व आदिती तटकरे; राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या 3 महिलांची लागली वर्णी

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील घराणेशाही

ठाकरे कुटुंब

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. ठाकरे घराण्याच्या अवतीभवती महाराष्ट्राचे राजकारण फिरते. पण यंदा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कदम कुटुंब

माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेतली आहे.

पवार कुटूंब

विधानसभा निवडणूकीनंतर राज्यातील सत्ता कोंडी फोडण्यासाठी शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

पाटील कुटुंब

माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांचे पुत्र सतेज पाटील यांना देखील आज मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळाले. कॉंग्रेस पक्षाचे सतेज पाटील यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते कोल्हापूरातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

तटकरे कुटुंब

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील तटकरे यांची लेक आदिती तटकरे यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

देशमुख कुटुंब

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही लेक धीरज देशमुख आणि अमित देशमुख यंदा लातूर मधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यापैकी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे अमित देशमुख यांची वर्णी कॅबिनेट मंत्रीपदासाठी लागली आहे.

मुंडे कुटूंब

यंदाच्या विधानसभा निवडणूकीमध्ये मुंडे कुटुंबाची चर्चा जोरात होती. मुंडे बहिण -भावामध्ये झालेली चुरस अगदी वैयक्तिक पातळीवर गेली. मात्र धनंजय मुंडे यांनी निवडणूकीत बाजी मारल्यानंतर आता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. दिवंगत भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत.

गायकवाड कुटुंब

कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ गायकवाड यांची लेक वर्षा गायकवाड यांनीदेखील आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

प्राजक्त तनपुरे

प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

दरम्यान आज विधानभवन प्रांगण परिसरामध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 36 जणांचा समावेश झाला आहे. दरम्यान या नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांसोबत आज कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे.