बुलढाणा जिल्ह्यात विहिरीमध्ये आढळले महिलेसह चार मुलींचे मृतदेह; पोलिस तपास सुरू
Representational Image (Photo Credits: ANI)

बुलढाणा जिल्ह्यातील माळेगाव परिसरात आज (23 सप्टेंबर) दिवशी एका महिलेसह चार मुलींचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने खळबळ पसरली आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीच माहिती मिळाली नसून पोलिस तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मेहेकर तालुक्यातील माळेगाव या भागात आज सकाळी अचानक विहिरीत पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकर्‍यांनी पाहिले. त्यानंतर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अधिक पोलिस तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार माळेगावमध्ये विहीरीत सापडलेले हे पाचही मृतदेह एकाच परिवारातील असल्याचं समोर आलं आहे. यामधील 25 वर्षीय महिला उज्वला ढोके सोबत वैष्णवी ढोके (वय ९), दुर्गा ढोके (वय ७), आरुषी ढोके (वय ४), पल्लवी ढोके वय (एक वर्ष) अशी या मृतांची नावं आहेत.

ANI Tweet 

गावकर्‍यांना पाचही मृतदेह तरंगत असल्याचं पाहिल्यानंतर गावकर्‍यांनी मृतदेह बाहेर काढले. सध्या त्यांच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.