Maharashtra Assembly Elections 2019: तृतीयपंथी नताशा लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात; चिंचवड मतदारसंघातून उमेदवारी घोषित
Maharashtra Election (FIle Image)

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या (Maharashtra Assembly Elections) तारखा जाहीर झाल्यावर आता हळूहळू सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी घोषित करत आहेत. अशातच पुणे (Pune) येथील चिंचवड (Chinchwad) मतदार संघातून तृतीयपंथी गटातील नताशा लोखंडे (Natasha lokhande) यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजत आहे. सोमवारी (23 सप्टेंबर) रोजी एका खास पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा करण्यात आली. नताशा या जनहित लोकशाही पक्षाच्या उमेदवार आहेत तर याच ठिकाणहून अन्य चार उमेदवार देखील निवडणूक लढवणार असल्याचे समजत आहे.

लोकसत्ता दैनिकाच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड मतदार संघामध्ये जनहित लोकशाही पक्षा कडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी चार उमेदवारमैदानात उतरणार आहेत. यामध्ये मावळ मतदारसंघातून संतोष चौधरी, भोसरी येथून विश्वास गजमल, चिंचवड मधून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी मतदारसंघात अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत उमेदवारी यादी बाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर नताशा यांनी पत्रकारणशी संवाद साधला. आजवर तृतीयपंथीचे प्रश्न राजकारणात आवश्यक तितके महत्व देऊन मांडण्यात आले नाहीत पण माझा हा लढा हा सरकारविरोधी असणार आहे, मला निवडणूक लढवायची आहे आणि मी यातून माघार घेणार नाही असे नताशा यांनी सांगितले. मात्र परिसरातील प्रश्नांबाबत पत्रकारांनी विचारताच नताशा यांची चांगलीच धांदळ उडाली आहे.

दरम्यान, विधानसभेसाठी येत्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये 21 तारखेला मतदान घेण्यात येणार आहे. यंदाही मतदान केवळ एकाच टप्प्यात पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.