Maharashtra Assembly Election 2019 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांचा दणदणीत विजय झाला आहे. राज्यात परळी मतदारसंघातील भाऊ-बहिणीमधील लढतीमुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला होता. दरम्यान, परळी मतदारसंघातील निकाल अनाकलनीय आहे. मतदारांनी दिलेला कौल मान्य असून कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. (हेही वाचा - विधानसभेची नाही, ही तर नात्यांची लढाई; जाणून घ्या कुटुंबातील लढतीमध्ये कोणी आहे आघाडीवर)
पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परळीत सभा घेतली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. पंकजा यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव येथे झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचादेखील मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या जनतेची पसंती 'नोटा' ला? बोरीवली, लातूर ग्रामीण सह 'या' ठिकाणची आश्चर्यकारक आकडेवारी पहा
परळीत विजयी झालेल्या धनंजय मुंडेंना एकूण 1 लाख 2 हजार 44 मते मिळाली. तर पंकजा मुंडे यांना 73 हजार 808 मते मिळाली. पंकजा यांचा तब्बल 28 हजार 236 मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान, परळीतील निकाल अनाकलनीय असून बीड जिल्ह्यातील राजकारणाचा कल आपल्या लक्षात आला आहे. माझ्या पराभवासाठी मी कुणाला दोष देणार नाही, असे मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.