अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस; सरकारविरोधात राळेगणसिद्धी मध्ये ग्रामस्थांचं जेलभरो आंदोलन
अण्णा हजारे (Photo Credits: PTI)

Anna Hazare Hunger Strike Day 4: लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) बेमुदत उपोषण करत आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार करूनही सरकारकडून अपेक्षित पावलं उचलली जात नसल्याने आज आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळेस राळेगणसिद्धीमध्ये (Ralegan Siddhi)  जेलभरो आंदोलन सुरु केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.

राळेगणसिद्धीमध्ये काही तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून अनोख्या स्टाईलमध्ये आंदोलन केलं. यादरम्यान जेलभरो आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना, महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. झेंडे घेऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

माझ्या जीवाला काही झाल्यास मोदी जबाबदार

बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत आहे. त्यांचे वजन तीन किलोने कमी झाले आहे. 'उपोषणा दरम्यान माझ्या जीवाला काही झाल्यास त्याला नरेंद्र मोदी जबाबदार नसतील' असे अण्णा हजारे म्हणाले आहेत. अण्णांच्या पत्राला पंतप्रधान कार्यालयातून अवघ्या एका ओळीचं उत्तर आल्याचेही अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. शरीरात प्राण असेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.