Uddhav Thackeray | Photo Credits: Twitter / ANI

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरामध्ये आज मध्यरात्रीपासून मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना आता बससेवेचा फायदा घेता येणार आहे. अत्यावश्यक सेवामध्ये भाजीपाला, किराणा माल दुकानं, मेडिकल स्टोअर्स, आर्थिक व्यवहारांसाठी बॅंक आणि शेअर बाजार खुला राहणार आहेत. मात्र इतर खाजगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देताना सरकारी कर्मचार्‍यांनी केवळ 5% उपस्थितीमध्ये कार्यालयं सुरू ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 'मुंबई लोकल' सेवा आज मध्यरात्रीपासून बंद; Coronavirus च्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय.  

आता कोरोना त्याचा विळखा वाढवण्याआधी त्याला संपवण्यासाठी सज्ज रहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या क्वारंटाईनचे सल्ले दिलेल्यांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. होम क्वारंटाईनमध्ये राहत असलेल्यांनी काळजी घ्या. थोडे दिवस प्रिय व्यक्तींपासून दूर रहा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिला आहे. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असं म्हणत त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

ANI Tweet

महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. राज्यात सध्या 75 रूग्ण असून त्यांच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून काही रूग्णांच्या स्थितीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज देशभरात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. यामध्ये नागरिकांना सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर संध्याकाळी 5 वाजता वीरांप्रमाणे लढणार्‍या डॉक्टर्स, नर्स आणि अन्य अत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांना सलाम करण्यासाठी घंटा, टाळ्या किंवा शंख नाद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आजच्या जनता कर्फ्युमध्ये नागरिकांनी स्वतःहून घरीच बसणं पसंत केलं आहे.