मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' च्या चर्चांवर संजय राऊत यांचं मोठं विधान; पहा काय म्हणाले
Sanjay Raut | Photo Credit :- Facebook

मध्य प्रदेशामध्ये काल (10 मार्च) ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कॉंग्रेस पक्ष सदस्यत्त्वाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ पसरली. ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्यापाठोपाठ त्यांच्या 22 समर्थकांनीही राजीनामा धाडल्याने मध्यप्रदेश विधानसभेतील सरकार धोक्यात आले. दरम्यान यामुळे मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाल्याने आता देशातील इतर बिगर भाजपा सरकारमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचादेखिल समावेश आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'च्या चर्चांना संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. आज (10 मार्च) संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीट मध्ये 'महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला मध्यप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी. असे त्यांनी म्हटलं आहे. MP Political Crisis: ग्वाल्हेरच्या शिंदे कुटुंबाची राजकीय वाटचाल, राजमाता ते आजचे ज्योतिरादित्य सिंधिया

एकेकाळी शिवसेना-भाजपा युती सत्तेमध्ये होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतर भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेस, एनसीपी सोबत हात मिळवणी केली. त्यामुळे आता महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो अशी चर्चा रंगली होती. मात्र भजापा नेत्यांनी आपण स्वतःहून सरकार पाडणार नाही ते त्यांच्या कर्मानेच पडेल अशी वक्तव्य करण्यात आली आहेत.

संजय राऊत यांचे ट्वीट  

दरम्यान मध्य प्रदेशामध्ये विधानसभेच्या 230 जागा आहेत. त्यापैकी 114 जागांसह काँग्रेस सत्तेत आहे तर भाजपाच्या 107 जागा आहे. यामध्ये 22 कॉंग्रेस आमदारांनी राजीनामे धाडल्याने आता कमलनाथ सरकार अल्पमतामध्ये आले आहे. दरम्यान बंडखोरांची मनधरणी केली जाईल असे सांगत सरकार वाचवण्याचे प्रयत्न कॉंग्रेस पक्षाकडून सुरू आहेत.