महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी शनिवारी सांगितले की, राज्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या चौकशीदरम्यान ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणे ‘मोठ्या संख्येने’ आढळून आली आहेत. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये गृहखात्याची जबाबदारी सांभाळणारे फडणवीस म्हणाले की, राज्यात हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारी शोधण्याचे प्रमाण 90 ते 95 टक्के आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये, त्यांना आढळले की खोटी आश्वासने दिली गेली किंवा खोटी ओळख वापरून फसवणूक करण्यात आली. अगदी विवाहित व्यक्तींनी देखील स्त्रियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ‘लव्ह जिहाद’ म्हणून संबोधली जाणारी प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात पुढे आली आहेत. फडणवीस यांनी नमूद केले की, ते यावर (लव्ह जिहाद) कायदा आणण्याचा विचार करत आहेत. या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यासही केला जात आहे. (हेही वाचा: Pune Crime: शाळेतील 'गुड टच, बॅड टच' मार्गदर्शनामुळे फुटली अन्यायाला वाचा, पुणे येथे तिघांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड)
‘लव्ह जिहाद’ हा शब्द सर्वसामान्यपणे उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून वापरला जातो. यामध्ये मुस्लिम पुरुष हिंदू महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करत असल्याचा आरोप केला जातो. नुकतेच राज्य महिला आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे की, वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 5,600 पेक्षा जास्त महिला बेपता झाल्या आहेत.
दरम्यान, फडणवीस यांना बिहारमधील अल्पवयीन मुले महाराष्ट्रातील ट्रेनमध्ये सापडल्याबद्दल विचारले असता, फडणवीस म्हणाले की, बाल तस्करीची समस्या संपवण्यासाठी त्यांचा विभाग गंभीर आहे. हा धोका संपवण्यासाठी राज्य सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच दानापूर-पुणे एक्स्प्रेसने बिहारमधून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या 59 मुलांची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. मनमाडमधून 30 तर भुसावळ रेल्वे स्थानकातून 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. ही मुले तस्करीसाठी रेल्वेने आणली जात असून सांगली किंवा पुण्यातील मदरशात त्यांना आणण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय आहे.