दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. अशात महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. श्रद्धा हत्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील अशा अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे शिंदे-फडणवीस सरकार अशा हरवलेल्या तरुणी आणि महिलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करत आहे. शुक्रवारी महिला आयोगाच्या बैठकीत लोढा बोलत होते.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, आम्ही राज्य महिला आयोगाला एक पथक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, दिल्लीतील नुकत्याच घडलेल्या घटनेत आपण पाहिले आहे की, जेव्हा मुली 18 वर्षांच्या होतात तेव्हा त्यांना कुटुंब किंवा पोलीस थांबवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करतात. या मुलींना माहित आहे की या या लग्नानंतर त्यांना कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळणार नाही. (हेही वाचा: खोट्या आश्वासनांवर शिंदे सरकार चालत आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल)
राज्यमंत्री म्हणाले, अशा परिस्थितीत इतर मुलींसोबत असे घडू नये याची काळजी हा स्कॉड घेईल. हे पथक अशा मुलींना आवश्यक ती मदत आणि संरक्षण देईल. मंत्री म्हणाले की, श्रद्धा सारख्या मुलींशी गैरवर्तन केले जात आहे कारण गुन्हेगारांना माहित आहे की, त्यांना त्यांचे पालक किंवा त्यांच्या माहेरच्या कोणत्याही सदस्याचा पाठिंबा नाही. अशा स्थितीत गुन्हेगारांची मनमानी चालते. अशा मुली आणि महिलांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी ही विशेष टीम तयार करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.