लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, पक्षांकडून आपापल्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. आता महत्वाचा आहे तो प्रचार. युपीनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे 48 जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात एकूण 8 सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कमीत कमी 98 सभा घेतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्री प्रत्येक मतदारसंघात दोन सभा घेतील. गुरुवारी मुंबई येथे भाजप आणि शिवसेना यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यामध्ये भाजपच्या प्रचाराची मोठी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. सुरुवातीला सेना-भाजप काही सभा एकत्र घेतील त्यानंतर दोन्ही नेते स्वतंत्र सभा घेणार आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी दोन्ही नेते पोहोचावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भमध्ये 10 जागा, मराठवाड्यात 8, उत्तर महाराष्ट्रात 6 आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे प्रत्येकी 12 जागा आहेत. (हेही वाचा: नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी कमी, रिकाम्या खुर्च्याच अधिक; विरोधकांनी उडवली खिल्ली)
महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक टप्प्यात दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. या सभा कुठे घ्यायच्या आणि सभांची संख्या वाढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पीएम मोदीच घेणार आहेत. मोदींची पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे.