कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देश 24 मार्च पासून लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. त्यानंतर कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी चार टप्प्यात वाढवण्यात आला. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक 1 (Unlock 1) च्या माध्यमातून देशासह राज्यातील अनेक सेवा-सुविधा सुरु करण्यास परवागनी देण्यात आली. अनलॉक 1 अंतर्गत जीम, गार्डन्स देखील नागरिकांसाठी खुली करण्यात आली. परंतु, काही ठिकाणी गर्दी व्हायला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे संकट अद्याप टळलेलं नाही म्हणत गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागणार, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. काही समाजमाध्यमे, वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून दुकाने बंद करणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे. तसंच गर्दी करु नका, काळजी घ्या, सुचनांचे पालन करा असेही आवाहन करण्यात आले आहे.
"लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. परंतु, कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या," असे आवाहन आणि विनंती मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. तसंच शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अफवा पसरविणाऱ्या बातम्या,पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. (Coronavirus Update: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)
CMO Maharashtra Tweet:
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 12, 2020
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 97648 वर पोहचला असून 3590 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 47968 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 46078 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बाहेर पडण्याची मुभा मिळाली असली तरी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.