Lockdown Free Pune: पुणे उद्यापासून लॉकडाऊन मुक्त; निर्बंध मात्र कायम; पाहा काय आहेत नियम
Lockdown | (Photo Credit: Pixabay)

राज्य सरकार आणि प्रशासनाने संकेत दिल्याप्रमाणे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून (24 जुलै 52020) पुणे लॉकडाऊन मुक्त (Lockdown Free Pune) असणार आहे. मात्र, लॉकडाऊन (Lockdown) मुक्त याचा अर्थ सर्व काही सुरु आणि पूर्ववत असा नव्हे. राज्य शासनाने घालून दिलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त (Commissioner Of Pune) विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर नेहमीप्रमाणेच मर्यादा असणार आहेत. काय आहेत हे निर्बंध आणि काय, कसे आणि कोणत्या वेळात सुरु, बंद घ्या जाऊन.

लॉकडाऊनमुक्त पुण्यात लागू असलेले निर्बंध

  • पुणे शहरात कोरोना व्हायरस (कोविड 19) नियंत्रणासाठी लागू असलेले सर्व नियम, निर्बंध कायम राहतील.
  • पुणे महानगर पालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीस रात्री 9 ते पाहाटे 5 वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. याला अत्यावश्यक सेवा अपवाद आहेत.
  • लहान मुले (वय वर्षे 10 पेक्षा कमी), ज्येष्ठ नागरिक (वय वर्षे 65 पेक्षा जास्त), गर्भवती महिला यांना आरोग्य अथवा अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
  • वरील सर्व आदेश 24 जुलै पासून पुढे पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहतील.

तर तो परिसर सिल करण्यात येईल

एखादे क्षेत्र प्रतिबंधित असे किंवा एखाद्या परिसरात, ठिकाणी कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे असे ध्यानात आले तर तो परिसर, इमारत तत्काळ सील करण्यात येईल. प्रामुख्याने विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था सील करण्यात येईल. त्या कार्यक्षेत्रात काम करणारे, जबाबदारी असलेले सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र सील करण्याची जबाबदारी पार पाडतील. (हेही वाचा;Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज दिवसभरात 9895 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद, 298 जणांचा मृत्यू; राज्यातील COVID 19 एकूण रुग्णसंख्या 3,47,502 )

दरम्यान, एखादा भाग कटेंन्मेंट झोन असेल तर त्या हद्दीत वैद्यकीय, आपात्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंची सेवा व पुरवठा अखंडीत सुरु राहावा यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधित परिसारात प्रवेश करायला किंवा बाहेर पडायला मुभा आहे. इतर व्यक्तिंना संबंधित क्षेत्रात प्रवेश करणे किंवा त्या क्षेत्रातून बाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच महानगरपालिकेची अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, उदा. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा गाडी व त्यावरचे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी प्रतिबंधित क्षेत्रात केव्हाही प्रवेश करतील. त्यासाठी त्यांना कोणतीही हरकत नाही.