भारतात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळातील निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाल्यानंतर रस्त्यांवरील गर्दीत मोठी वाढ होऊ लागली आहे. देशातील 10 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर, सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (22 नोव्हेंबर) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा संवाद साधला होता. महाराष्ट्रावरील संकट अद्याप टळलेले नसून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोनाची लाट नव्हेतर, त्सुनामीच येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच राज्यात तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. हे देखील वाचा- Mumbai Local Update: या आठवड्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली माहिती
राजेश टोपे-
"राज्यातील नागरिकांची बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात येणार आहे. लॉकडाऊन लावण्यात येणार नसला तरी, शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे", असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार-
"पुढील आठ दिवसात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या किती पटीने वाढतेय त्याचा आढावा महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. राज्यातील संख्या वाढली तर दिल्ली गुजरातवरून येणारी रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा बंद करण्याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
अनिल परब-
" संपूर्ण जगासमोर कोरोनाचे संकट आहे. पण या संकटात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या घेतलेल्या काळजीचे जगाने कौतुक केले आहे. लॉकडाऊन करावे या मताचे सरकार नाही. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मुंबईत वाढणारे कोरोनाचे रुग्ण, त्यातून होणारा प्रसार या सर्व बाबी त्यासाठी पाहिल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील हीच भूमिका मांडली होती, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 5 हजार 753 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 17 लाख 80 हजार 208 वर पोहचली आहे. यांपैकी 46 हजार 623 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाख 51 हजार 64 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 81 हजार 512 जणांवर उपचार सुरु आहेत.