नाशिक मध्ये कडक होणार लॉकडाऊन; संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यु प्रमाणे संचारबंदी
छगन भुजबळ । Photo Credits: Twitter

नाशिक मध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान 1 जुलै पासून महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये आता लॉकडाऊनचा 6वा टप्पा सुरू झाला आहे. पण लॉकडाऊनसोबत अनलॉकिंग देखील सुरू होत असल्याने अनेक जण बेशिस्तपणे वागत आहे. परिणामी नियंत्रणामध्ये असलेला कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढू नये म्हणून लॉकडाऊन नाशिक जिल्ह्यामध्ये कडक करण्यात आला आहे. नाशकात 1 जुलैपासून संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यु प्रमाणे संचारबंदी असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

नाशिक मध्ये आज कोरोना नियंत्रणासाठी एक आढावा बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक जाणिवेतून मदत करण्याच्या हेतूने औद्योगिक संस्थानी पुढाकार घेवून आपली भुमिका आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर मांडली. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील उपस्थित होते.

PTI Tweet 

नाशिक पूर्व विभागात करोनाचे सर्वाधिक 678 रूग्ण आहेत. त्या खालोखाल पंचवटीत 571 रुग्ण असून उर्वरित चार विभागात रुग्णसंख्या 200 पेक्षा कमी आहे. दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा वेगाने फैलाव होत असून काल (29 जून)पर्यंत शहराच्या रुग्णसंख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. नाशिक मध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत आहे. दरम्यान आता पावसाचे दिवस असल्याने कोरोना फैलाव रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.