Lockdown 4.0: देशात उद्यापासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात; महाराष्ट्रात अनेक नियमांना शिथिलता दिली जाण्याची शक्यता
Chief Minister Uddhav Thackeray | (संग्रहित छायाचित्र, सौजन्य - फेसबुक)

लॉकडाउनचा (Lockdown) तिसरा टप्पा आज म्हणजेच 17 मे रोजी समाप्त असून केंद्र सरकारने (Central Government) आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली होती. लॉकडाउनबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत  महाराष्ट्रात (Maharashtra)  लॉकडाउनचा कालावधी वाढवला जावा, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानुसार, आज राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घोषणा केल्याप्रमाणे चौथा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकारकडून नव्या लॉकडाऊन संदर्भातील नियमावली तयार केली जाणार असून अनेक नियमांना शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर राज्यात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणे आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- वानखडे बरोबर ब्रेबॉर्न मैदानाचाही क्वारंटाइन केंद्रासाठी विचार करावा- संजय राऊत

राज्यात उद्यापासून म्हणजेच 18 मेपासून लाकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक नियमांना शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कंटेनमेंट झोन वगळता रेड झोनमधील अनेक व्यवहारांना मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याची ठिकाण असलेल्या काही शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, शहर वगळता तालुके आणि ग्रामीण भागात संसर्ग झालेला नाही, अशी स्थिती असलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांच्या बाबतही लॉकडाउनमधून शिथिलता दिली जाऊ शकते.

कोरोनामुळे भारतात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवले जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवले जाणार आहे, याबद्दल माहिती दिलेली नाही.