कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव पाहता, गेल्या काही दिवसांत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गर्दी टाळण्यासाठी अनेक सेवा बंद केल्या आहेत. मुंबई तसेच पुणे येथे दुकाने, मॉल्स, पब्ज अशा गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. आता याच पावलावर पाऊल टाकत नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, बार, दारूची दुकाने आणि पान टपऱ्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (Ravindra Thakre) यांनी आज, बुधवरी ही माहिती दिली. सध्या जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या चार रुग्णांची पुष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेक खबरदारीचे उपाय रावबले जात आहेत.
Ravindra Thakre, District Collector, Nagpur: Liquor shops, restaurants & paan shops will remain closed from today till 31st March, in order to control the spread of #COVID19. #Maharashtra
— ANI (@ANI) March 18, 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, लोकांनी एकांतात राहण्याची गरज आहे. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्याची गरज आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार 18 मार्च ते 31 मार्च या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील, सर्व बिअर शॉप्स, वाइन शॉप्स, परमिट रूम्स, बार आणि रेस्टॉरंट्स, क्लब, देशी दारूची दुकाने, पान टपऱ्या बंद राहणार आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिक्षकांंनाही Work From Home ची मुभा)
याआधी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपूरमध्ये कलम 144 लागू केला. दरम्यान, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 152 झाली आहे. आज नोएडामध्ये आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे, तर कर्नाटकात दोन आणि तेलंगणात एक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 42 झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल बीएमसीकडून सर्व खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना, कोणत्याही दिवशी केवळ 50% कर्मचार्यांनाच कार्यालयात येण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.