Maharashtra Weather Forecast: सध्या राज्यातील काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातचं आता राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.
कोकणात पावसाचा इशारा -
राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. तथापी, तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. दिवसा किमान तापमानात 3-5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांसाठी दक्षिण कोकणात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात हलक्या पावसाचा इशारा -
मराठवाड्यासाठी पुढील तीन दिवस गंभीर आहेत. 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी येथे सर्वात कमी किमान तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर गोंदिया, नागपूर, वर्धा आणि ब्रह्मपुरी जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 7-8 अंश सेल्सिअस दरम्यान होते. या भागात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट -
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट तीव्र झाली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत, बहुतेक ठिकाणी किमान तापमानात 2-4 अंशांनी घट झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.