Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली माहिती, 'म्हणाले प्रकृती स्थिर मात्र सर्वांनी प्रार्थना करा!'
Lata Mangeshkar | (photo Credit - Twitter/ANI)

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना मुबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात विशेष सुधारणा (Lata Mangeshkar Health Update) झाली नाही. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून, डॉक्टरांशीवाय त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. त्यांच्याबातब अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आराम पडावा यासाठी प्रार्थना करावी, असे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे. डॉक्टरांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत वृत्त दिले आहे.

लता मंगेशकर यांना कोरोना व्हायरस संसर्गासोबतच न्यूमोनियाही झाला आहे. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी आणखी दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल.त्यामुळे लताजींना किती दिवसात आराम पडेल किंवा त्या किती दिवसांमध्ये बऱ्या होतील याबातब इतक्यातच काही सांगता येणार नाही, असेही डॉक्टर म्हणाले. लताजी यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना करावी, असेही अवाहन डॉक्टरांनी केले आहे. (हेही वाचा, Lata Mangeshkar In ICU: लता मंगेशकर Covid-19 संक्रमित; Breach Candy Hospital रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु)

लता मंगेशकर यांचे वय पाहता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या 92 वर्षांच्या आहेत. भारतीय संगीत विश्वात लता मंगेशकर हे एक पान नेहमीच आदरपात्र आणि मैलाचा दगड ठरले आहे. गायन आणि संगित क्षेत्राबाबत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च समजला जाणारा मानाचा 'भारतरत्न' हा पुरस्कारही लता मंगेशकर यांना देण्यात आला आहे. याशविाय दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनेही त्यांची दखल घेतली आहे. 1948 ते 1974 या काळात त्यांनी 25,000 पेक्षाही अधिक गाणी गायली आहेत.