मोठ्या आशेने पालक मुलांना शाळेत पाठवतात, मात्र मुले शाळेत नक्की काय करतात? कसले संस्कार आणि विचार बाळगतात यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मुंबईच्या प्रतिष्ठित शाळेत शिकणारी मुले... मुलींचा उल्लेख करताना ही मुले गालिच्छ शब्द वापरतात, आपल्याच वर्गातील मुलींवर बलात्कार (Rape) करण्याची भाषा वापरतात, इतकेच नाहीतर गँगबँगपर्यंत (GangBang) या मुलांची मजल गेली आहे. महत्वाचे म्हणजे ही मुले आहेत फक्त 13, 14 वर्षांची. मुंबईतील एका दैनिक वृत्तानुसार, शहरातील आयबी (International Board) शाळेतून आठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) अतिशय अश्लील गोष्टी आढळल्या आहेत.
या मुलांच्या चॅटमध्ये सोशल मिडीयावर वापरल्या जाणाऱ्या हिंसक आणि अश्लील शब्दांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, मुलांच्या त्यांच्या वर्गातील एका मुलीबद्दलच्या संभाषणात, ‘गँगबँग’ शब्दाचा उल्लेख आढळतो. सोबतच आपल्या वर्गमित्रांना गे आणि लेस्बियन म्हणून हिणवलेही जात आहे. हे प्रकरण समोर आल्यावर शाळेतील अनेक मुली शाळेत जाण्यास घाबरत आहेत. एका मुलीच्या पालकांनी पालक चॅट ग्रुपवर हे संभाषण शेअर केले होते.
सोशल मिडीयावरवरही या प्रकरणाबाबत अनेकांनी कमेंट करून आपले विचार नोंदवले आहेत. ‘पालक म्हणून आपण कुठे कमी पडत आहोत, हे शोधायला हवे’ असे एका युजरने लिहिले आहे. तर अजून एक युजर म्हणतो, ‘अशा गोष्टींमुळेच महिलांरील अत्याचार वाढले आहेत.’ याबाबत अनेक पालकांनी मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचे म्हटले आहे.