भाडेकरू महिलेवर बलात्कार, पीडिता गर्भवती; घरभाडे वसूलीसाठी घरमालकाचे कृत्य
( Photo courtesy: archived, edited, symbolic images)

आजारी पतीच्या औषधोपचारासाठी घेतलेल्या कर्ज आणि थकलेले घरभाडे (House Rent) वसूल करण्यासाठी घरमालकाने (Landlord) भाडेकरु असलेल्या असहाय महिलेवर (tenant women) चक्क बलात्कार केला आहे. क्रूर घरमालकाची विकृती इतक्यावरच थांबली नाही. तर, त्याने अन्य एका महिलेच्या माध्यमातून पीडितेचा अनन्वीत छळ तर केलाच. पण, तिला देहव्यापार करण्यासाठी जबरदस्तीही केली. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात (Nagpur ) ही घटना घडली आहे. नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, माणिक रामचंद्र नेवारे (५३) रा. लष्करीबाग आणि आशा भूषण शर्मा (५०) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी माणिक नेवारे याला पोलीसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, आशा शर्मा फरार आहे. दरम्यान, पीडित महिला ही आरोपी असलेला घरमालक नेवारे याच्या घरात पती आणि दोन मुलांसोबत भाड्याने राहात असे. तर, घरमालक नेवारे हा महापालिकेत मोहरीर पदावर कम करतो. दरम्यान, पीडितेची घरची स्थिती नाजूक आहे. पीडिता आणि तिचा पती मजुरी करतात. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची एक मुलगी आहे. आर्थिक स्थिती हालाकीची असल्यामुळे अनेकदा घरभाडे द्यायला विलंब व्हायचा. घरभाडे थकायचे. दरम्यान, याचाच गैरफायदा घेत नेवारे याने पीडितेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

मे-2018मध्ये घरमालक नेवारे हा पीडितेकडे घरभाडे मागण्यासाठी आला. या वेळी तिचा पती कामावर गेला होता. तर, मुले खेळायला गेली होती. त्यामुळे पीडिता घरी एकटीच होती. घरमालकाने घरभाडे देण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. पैसे नसल्याने पीडितेने काही दिवसांनंतर या पैसे देतो असे सांगितले. पण, घरमालक ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. पीडिता गयावया करत होती पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच, वेळेत भाडे दिले नाही तर, पुन्हा असेच करण्याची धमकी दिली. दरम्यानच्या काळात पीडितेचा पती आजारी पडला. त्यामुळे ती अधिकच आर्थिक संकटात सापडली. पीडितेची असहायता पाहून घरमालकाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका आशा नावाच्या महिलेशी तिची ओळख करुन दिली.

एका व्यक्तीकडून आशा हिने 25 हजार रुपये उधार घेऊन पीडितेला दिले. या पैशाच्या परताव्यासाठी ती पीडितेवर जबरदस्ती करु लागली. पीडितेने पैशांचा परतावा करण्यास असमर्थता दर्शवता आशाने तिला देहव्यापाराचा मार्ग दाखवला. ती पीडितेला देहव्यापाराठी जबरदस्ती करु लागली. आशा गिऱ्हाईक शोधायची आणि पीडितेला त्याच्याकडे पाठवायची. या व्यवहारात ती ग्राहकांकडून 4 ते 5 हजार रुपये घ्यायची. मात्र, पीडितेला केवळ प्रतिग्राहक 500 रुपये इतकेच पैसे मिळायचे.

दरम्यान, आपले घर जाईल या भीतीने पीडिता बराच काळ शांत बसली. मात्र, घरमालक तिच्यावर त्याला वाट्टेल तेव्हा अत्याचार करु लागला. तसेच, आशा पैशासाठी तिचा छळ करु लागली. अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडितेने व तिच्या पतीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरमालक आरोपी नेवारे याला अटक केली आहे. तर, दुसऱ्या आरोपीचा पोलीस तपास करत आहेत.