लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांकडून भक्तांना नेहमीच कस्पटासारखी वागणूक दिली जाते. याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. आता लालबागचा राजा गणेश मंडळ दर्शनादरम्यान व्हीआयपी आणि सामान्य भाविक यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन वकिलांनी मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रसिद्ध मंडळामध्ये बाप्पांचे दर्शन घेताना, सामान्य लोक आणि व्हीआयपींना परस्परविरोधी वागणूक दिली जात असल्याचे दर्शवणारे व्हायरल व्हिडिओनंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
व्हिडिओमध्ये, मंडळ कर्मचारी गणेशाचे दर्शांन घेताना लगेचच भक्तांना जबरदस्तीने ढकलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे व्हीआयपींचा एक वेगळा गट बाप्पांच्या समोर सेल्फी घेत आहे. या प्रकाराबद्दल आशिष राय आणि पंकज मिश्रा या वकिलांनी या असमान वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांच्या कर्मचाऱ्यांचा हा माजोरडेपणा सुरु आह्रे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती या दोन वकिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली असून, त्यांच्या तक्रारीच्या प्रती राज्य महिला आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाठवल्या आहेत.
या तक्रारीत लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसारख्या असुरक्षित गटांना दिलेली कठोर वागणूक अधोरेखित केली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून कथितपणे कथितपणे गैरवर्तन केले जाते आणि काहीवेळा हे लोक भक्तांना मारहाणही करतात. याबाबत अधिवक्ता मिश्रा म्हणाले, इथे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना वाईट वागणूक दिली जाते, अपमानित केले जाते आणि मारहाण केली जाते. अशी व्यवस्था अत्यंत हानिकारक आहे.’ (हेही वाचा: Lalbaugcha Raja New Viral Video: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान सेलिब्रेटी आणि सामान्य भक्तांना वेगवेगळी वागणूक; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फुटले नव्या वादाला तोंड)
आशिष राय म्हणाले, हे मंडळ जगप्रसिद्ध आहे, इथे पोलीस बंदोबस्त आहे, तरीही ही सुरक्षा व्हीआयपींपुरती मर्यादित आहे. सामान्य भाविकांना असे संरक्षण मिळत नाही. मंडळाच्या आर्थिक स्त्रोतांचा विचार करून, या असुरक्षित गटांना प्राधान्य दिले पाहिजे. भक्तांना तक्रारी नोंदवण्यासाठी घटनास्थळी तक्रार पेटी बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राय यांच्या मते, मंडळामधील कर्मचारी अप्रशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे मूलभूत मानवी व्यवस्थापन कौशल्यांचा अभाव आहे. हा मुद्दा वर्षानुवर्षे कायम आहे, आणि व्हायरल व्हिडिओमुळेच समोर आला आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात याबाबत सुधारणा न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे त्यांनी सांगितले.