पावसाळ्याच्या दिवसात कोकणाचं विहंगम दृश्य पाहण्याची मज्जा काही और असते. कोकणात मान्सूनच्या दिवसांत धुव्वाधार पाऊस पडतो. अनेक ठिकाणी रूळाला तडे जाणं, दरडी कोसळणं हे प्रकार घडतात. त्यामुळे 5 महिन्यांसाठी कोकण रेल्वेसाठी वेगळं वेळापत्रक जारी केलं जातं. अद्याप महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं नाही पण कोकण रेल्वे (Konkan Railway) 10 जून पासून पावसाळी वेळापत्रकानुसार चालवण्यास सुरूवात झाली आहे. कोकण रेल्वेचं हे वेळापत्रक (Konkan Railway Monsoon Time Table) 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी ट्रेनच्या वेळेत झालेले बदल पाहूनच स्टेशनवर पोहचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेप्रवास सुरळीत ठेवण्यासाठी 673 जवान गस्त घालणार आहेत. पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण रेल्वेचा वेग ताशी 40 किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवला जाणार आहे. यामुळे 37 गाड्यांच्या वेळांमध्ये बदल झाले आहे. तेजस एक्सप्रेस, मांडवी, कोकण कन्या आदी ट्रेन्सने जाणार्यांनी प्रामुख्याने वेळा पाहून घ्याव्यात. रत्नागिरी आणि वेर्णा स्थानकांवर ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) आणि वेर्णा येथे एआरटी (अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन) देखील असेल. सुरक्षा कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्थानके आणि कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी मोबाइल फोन दिले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड्स ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट देण्यात आले आहेत.
पहा ट्वीट
Konkan Railway Gears up for Monsoon-2023. @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @SWRRLY pic.twitter.com/K1IltuUm6D
— Konkan Railway (@KonkanRailway) June 6, 2023
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकामध्ये रेल्वेची वेगमर्यादा 40-90 प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे. हे वेळापत्रक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असणार आहे.