Kolkata Doctor Rape-Murder Case: कोलकाता (Kolkata) येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशातील अनेक सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेले आहेत. याआधी दिल्लीच्या डॉक्टरांनी संपाची हाक दिली होती, आता मुंबईमधील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संचालित कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर मंगळवारी सकाळपासून, संपावर जाणार आहेत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी हा संप पुकारला आहे.
बीएमसी मार्डने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही बीएमसी मार्ड 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून, निवासी डॉक्टरांद्वारे निवडक/गैर-आपत्कालीन वैद्यकीय सेवा निलंबित करण्याची घोषणा करत आहोत. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवाशांच्या मागण्या मान्य होईपर्यंत, आमचा संप चालू राहील.’
यातील काही मागण्या पुढीलप्रमाणे-
- बलात्कार आणि हत्येचा प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय एजन्सीची तात्काळ नियुक्ती.
- केंद्रीय संरक्षण कायद्याची स्थापना.
- तात्काळ ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षा उपाय लागू करणे.
- संबंधित रुग्णालयांमध्ये बसवलेल्या एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा सविस्तर अहवाल. (हेही वाचा; Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा)
निवेदनात पुढे म्हनाटेल आहे, ‘फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) च्या एकजुटीने हा निर्णय घेतला आहे. एक संयुक्त आघाडी म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी आणि प्रत्येक आरोग्य सेवा कर्मचाऱ्याची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी एफओआरडीएसोबत उभे आहोत.’ संपादरम्यान, या बीएमसी संचालित रुग्णालयातील निवासी डॉक्टर आपत्कालीन कर्तव्यांसाठी त्यांची सेवा देत राहतील.